जेजुरी : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. ३०) भरणार आहे. खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी आणि इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक बदल
सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा- मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.
पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक
बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे. सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक बदल
पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
#पुरंदर तालुक्यातील #जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री #खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश जारी. pic.twitter.com/YDQZjQqKCm
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 27, 2024