पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंती पुणेकर ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करतात. पुणे शहराच्या मध्यभागी अनेक ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. यामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी विचारात घेऊन शिवजयंतीला पुण्यातील मध्यभागी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोभायात्रा संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. मात्र, वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गाची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग
– जिजामाता चौक येथून शिवाजी रस्ता ते स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
– गणेश रस्ता- दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक- दारुवाला पूल चौकातून वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.
– केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
– मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौक, समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येतील.
– पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जावे.
– मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
– मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत. तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजूकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
– मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जावे.
-स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जाता येईल.