पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. टोळ्यांच्या वर्चस्वावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरातील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी यंदा ६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ३० आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन उजागरे याच्यासह तीन जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली. टोळी प्रमुख पवन छगन उजागरे (रा. भोसरी), सुनिल जनार्दन सकट (वय-३२, रा. लांडेवाडी, भोसरी), दीपक रामकिसन हजारे (वय-२७, रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य उर्फ निरंजन आहिरराव याच्यासह चार जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आदित्य उर्फ निरंजन शाम आहिरराव (वय-३१, रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे), प्रतिक अशोक माने (वय-२०, रा. थेरगाव, पुणे), प्रेम संदीप तरडे (वय-१९, रा. काळेवाडी, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वरील दोन्ही टोळ्यांमधील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवली असून, वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.