पुणे : विमानातून पहिल्यांदा प्रवास करताना अनेकजण चिंतेत असतात. विमानात बसल्यावर भीती जास्त वाटते का, प्रवास कसा होईल, त्यात विमान प्रवासात कधी तांत्रिक बिघाड झाल्याचा विचार जरी आला तर आणखीन भिती वाटते. अशातच 36 हजार फूट उंचीवर विमान उडत असताना प्रवाशांना जेव्हा विमानात बिघाड झाल्याचे समजते, तेव्हा प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यावेळी पायलट क्रोम रिफादली फहमी झैनाल आणि सह वैमानिक मैत्रेयी शितोळे यांच्यासाठी ही खरी कसोटी होती. आणि त्यांनी धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरित्या खाली उतरवलं. यातील 140 प्रवाशांचा जीव वाचवणारी सह-वैमानिक मैत्रेयी शितोळे ही मुळची पुण्याची आहे.
नेमकं काय घडलं त्यावेळी ?
एअर इंडियाचे विमान आय एक्स 613 हे तामिळनाडूच्या त्रिचीहून शुक्रवारी शाहरजा येथे जात होते. विमानाने टेकऑफ घेतला. तब्बल 36 हजार फूट उंचीवर विमान होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजून 40 मिनीटांनी तीच्या विमानाने शारजा (युएई)साठी उड्डाण केले. विमानात 140 प्रवासी, दोन पायलट, क्रु मेंबर होते. मात्र थोड्याच वेळात वैमानिकांच्या लक्षात आले की, विमानाची हायड्रोलिक सिस्टीम अचानक निकामी झाली आहे. विमानाला इमर्जन्सी लॅडिंग करावे लागणार होते. विमानात इंधनाचे प्रमाण ही जास्त होते. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इंधनाचे प्रमाण कमी करावे लागले. त्यामुळे विमान आकाशात तब्बल अडीच तास फिरत होते. त्यावेळी अनेकांना वाटले की, हे विमान नियंत्रणाच्या बाहेर गेले की काय? विमानतळावर गोंधळ उडला.
अधिकाऱ्यांनी एमर्जन्सी लॅडींगची घोषणा केली. त्याठिकाणी सुरक्षेसाठी 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पायलट आणि कोपायलट यांनी विमानास सुरक्षित उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितपणे खाली उतरले आणि 140 प्रवाशांचा जीव वाचला.
कोण आहे ही मैत्रेयी शितोळे …?
को पायलट मैत्रेयी शितोळे ही दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील रहिवासी आहे. मैत्रेयी एअर इंडियामध्ये पायलट असून एक वर्षाचा कामाचा अनुभव आहे. मैत्रेयीने व्यावसायिक विमान उड्डानाचे प्रशिक्षण न्यूझीलंडमध्ये घेतले आहे. काही दिवस न्यूझीलंडमध्येच तिने व्यावसायिक पायलट म्हणून कामही केले. त्यानंतर ती भारतात परत आली. त्यानंतर तिने ग्राउंड इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केले. मैत्रेयी ही वैमानिक होण्याआधी एयर नेव्हिगेशन, उड्डाणाच्या तांत्रिक बाबी तसेच विमान उड्डाणाच्या तांत्रिक गोष्टी यामध्ये प्राविण्य मिळवले. याबरोबरच मैत्रेयीने ताणवाखाली काम करण्याचे खास प्रशिक्षण घेतले असून प्रशासकीय आणि संगणकीय कामात ती निपून आहे.
दरम्यान, या कठीण प्रसंगात मुख्य वैमानिक क्रोम रिफादली फहमी आणि मैत्रेयीने दाखवलेल्या कौशल्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.