पुणे : जनतेमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्य निवडणुक विभागाने यंदा ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांत निवडणूक कामकाज विषयी जागृती व्हावी यादृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून गणेश मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीतच देखावा व सजावटीचे साहित्य पाठविणे आवश्यक आहे.
घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मताधिकाराचे आणि मतदार नोंदणीचे महत्त्व, मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता निर्माण करण्यासाठी अभिनव कल्पना राबविता येणार आहे.
मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करता येईल.
स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. स्पर्धेविषयी अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि गुगल फॉर्ममध्ये देण्यात आली आहे.
स्पर्धेची नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in आणि समाजमाध्यमांवर देण्यात आली आहे. गणेश मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी https://forms.gle/ 6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून देखावा, सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. गणेश मंडळांना ध्वनीचित्रफीत आणि छायाचित्रे अपलोड करताना अडचण आल्यास प्रणव सलगरकर – 8669058325 आणि तुषार पवार- 9987975553 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवावा.