Mahesh Landge | पिंपरी : बहुप्रतीक्षित रावेत ते निगडी उड्डाणपुलाच्या उर्वरित कामाला अखेर महापालिका प्रशासनाकडून सुरूवात झाली आहे. या पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निगडीच्या भक्ती शक्ती चौकापासून ते किवळे येथील मुकाई चौकापर्यंतचा बीआरटीएस मार्ग विकसित करीत आहे. यामुळे निगडी, आकुर्डी, भोसरी, midc व आसपासच्या परिसरातील लोकांना पुणे–मुंबई दृतगती मार्ग, मुंबई–बंगलूरू महामार्गाकडे व किवळेला लवकर पोहोचता येईल. तसेच, रावेत, किवळे परिसरातील लोकांना पुणे- मुंबई महामार्ग, निगडी व इतर ठिकाणी लवकर पोहोचता येणार आहे.
पुलास अडथळा ठरणारे तेथील उच्चदाब विद्युत वाहकतारा व टॉवर हटविण्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच येथील रेल्वेच्या उच्च दाब विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणेचेही काम पूर्ण करण्यात आले आहे. निगडी भक्ती शक्ती चौक ते रावेतच्या मुकाई चौक या 45 मीटर रस्त्यावर निसर्ग दर्शन सोसायटी येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यासाठी या पुलाची नितांत गरज होती, अशी माहिती प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.
रावेत ते निगडी या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार असून, निगडी प्राधिकरण, तसेच भक्ती शक्ती चौकातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. त्याचा शहरातील व शहराबाहेरील वाहतुकीसाठी फायदा होईल. तसेच, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू होऊ शकणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.