उरुळी कांचन : आचेगाव (जि. सोलापूर) येथे पार पडलेल्या ‘कै. हिंदकेसरी हजरत पटेल किताब २०२४’ च्या स्पर्धेत टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पैलवानाने मैदान गाजविले. अंतिम सामन्यात हरियाणाच्या पै. पवन कुमारला गुठना डाव टाकून चितपट करून किताब आपल्या नावावर केला.
महेश उर्फ महादेव दादासाहेब बागडे (वय २२, रा. टिळेकरवाडी, ता. हवेली) असे किताब जिंकलेल्या पैलवानाचे नाव आहे. महेशने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे राजकीय, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
महेश बागडे याचे वडील दादासाहेब हे एक हॉटेल व्यावसायिक आहेत. तर आई सुनीता या उत्तम गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह झालेला आहे. मुलगा महेश याचे उच्च माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधून झाले आहे. लहानपणापासूनच त्याला कुस्तीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी त्याने शिक्षण सोडून पूर्णपणे कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील हनुमान आखाडा येथे वस्ताद गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्तीचे धडे गिरवू लागला.
चांदीची गदा व २१ हजार रुपये देऊन गौरव
आचेगाव (जि. सोलापूर) येथे ‘कै. हिंदकेसरी हजरत पटेल किताब २०२४’ च्या कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडली. या स्पर्धेत १२० किलो ओपन गटात महेश याने भाग घेतला होता. या स्पर्धेची अंतिम लढत महेश व हरियाणाचा पै. पवन कुमार यांच्यात झाली. या लढतीत महेशने पवन कुमारला गुठना डाव टाकून अस्मान दाखवून किताब पटकावला. महेशला एक चांदीची गदा व २१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. महेशने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.