पुणे : तारेची दुरुस्ती करताना विजेचा झटका बसल्याने महावितरणचे तंत्रज्ञ प्रदीप यादव काटे (वय २७, रा. हडपसर) यांचा सोमवारी (दि. २९) मृत्यू झाला. तरुण कर्मचाऱ्याच्या अपघाती निधनामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काटे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील बोरगाव खुर्द (ता. कळंब) गावचे रहिवासी आहेत. तांत्रिक शिक्षण पूर्ण करून ते सात वर्षांपूर्वी महावितरणमध्ये नोकरीस लागले. लक्ष्मीनगर उपकेंद्रामध्ये ते नेमणुकीस होते. त्या भागातील एका विद्युत जोडणीमध्ये सोमवारी दुपारी बिघाड झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी ते एका सहकाऱ्यासोबत तेथे गेले होते. काम सुरू असताना अचानक तारेमध्ये विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.
हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना ते मरण पावले. काटे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर महावितरणमधील कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्णालयात जमले. काटे यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून, त्यांना दीड वर्षांचा मुलगा आहे. काटे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. बोरगाव खुर्द या मूळगावी मंगळवारी (दि. ३०) काटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.