पुणे : मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दोन लाख रुपये स्वीकारताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २३) सापळा लावून अटक केली. या विभागाच्या पथकाने त्याच्या कार्यालयावर व घराची झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) हे अटक करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एका विद्युत ठेकेदाराने तक्रार दिली आहे. तक्रारदाराने त्यांच्या ओळखीच्या व्यावसायिकांच्या ५ नवीन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारून सप्लाय चालू करून देण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल तयार करून मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता सावंत याच्या बंडगार्डन येथील महावितरण कार्यालयात दिल्या होत्या.
या ठेकेदाराने मांजरी येथील नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डीपीवर सावंत याच्याकडून वीजजोडणी करून दिली आहे. सावंत याच्याकडे तक्रारदार यांच्यावरील प्रलंबित असलेल्या पाच फाईलवर कार्यवाही करण्यासाठी आणि तक्रारदार यांनी मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीजभार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सावंत याने तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यासाठी ते त्याला वारंवार धमकावत होते. या ठेकेदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तांत्रिक पडताळणी केली. दरम्यान, सावंत याने लाचेच्या रकमेपैकी दोन लाख रुपये देण्यासाठी या ठेकेदाराला बुधवारी महावितरणच्या बंडगार्डन कार्यालयात बोलवले होते. तिथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सावंत याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक विरनाथ माने यांच्याकडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.