पुणे : विद्युत भार वाढविण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड येथील महावितरणाच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी येथे मंगळवारी (ता.३०) रंगेहाथ पकडले आहे. किरण गजेंद्र मोरे (वय ३३, पद-सहायक अभियंता, वर्ग-२) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फ्रेंड इलेक्ट्रानिक्स कंपनीचे सर्व कामकाज पाहतात. या कंपनीला सन राईस कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. सदरचा विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी लोकसेवक किरण मोरे यांच्याकडे होता. लोकसेवक किरण मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरचे काम करुन देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणाच्या भोसरी कार्यालयात मंगळवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून विद्युत भार वाढविण्यासाठी तडजोडीअंती ४५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना किरण मोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.