पुणे : यंदाच्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करताना महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सकारात्मक व्याख्यानाची जोड देण्यात आली. बुधवारी (ता. ११) सायंकाळी सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान झाले. तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची विद्युत सुरक्षेची शपथ घेतली व विद्युत सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला.
पुणे परिमंडलातील विविध संवर्गातील निवडक कर्मचाऱ्यांसाठी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत व सकारात्मकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ते म्हणाले, अंतर्मनात सकारात्मक विचार कायम ठेवले तर त्याचप्रमाणे कृती घडत जाते. नकारात्मक विचारांनी कृती देखील नकारात्मक होते. त्यामुळे आयुष्यात अडचणी व ताणतणाव वाढण्यास सुरवात होते. आरोग्यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा बिघडत जाते. एकाकीपणा येतो. आयुष्य उदास होते. त्यामुळे कौटुंबिक आणि नोकरीतील कर्तव्य व जबाबदाऱ्यांकडे जाणता अजाणता दुर्लक्ष होते. हे सर्व टाळून कोणतेही आव्हान स्वीकारणे व ते यशस्वी करणे यासाठी मनातील सकारात्मक विचार हेच खरे पाठबळ आहे असे डॉ. कोहिनकर यांनी सांगितले. त्यांच्या संपूर्ण व्याख्यानाला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की वीजग्राहकांना उत्कृष्ट तसेच तत्पर व आपुलकीची सेवा देणे महावितरणचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार रूजवणे महत्त्वाचे आहे. मनाची एकाग्रता व सजगता कायम ठेवून प्रत्येक काम सकारात्मकतेने केले पाहिजे. त्यातून कामाचा आनंद मिळतो, मानसिक समाधान मिळते. सोबतच वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करताना तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे. सतर्क राहून सर्व खबरदारी घ्यावी. तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत माहिती द्यावी असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
या कार्यक्रमात विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री प्रकाश राऊत व सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व श्रीमती ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर तसेच परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. महावितरणच्या विद्युत सुरक्षेचा जागर येत्या २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वर्गांचे तसेच नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर जनजागरण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
‘सीओईपी’कडून राजेंद्र पवार यांचा गौरव – सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. पवार यांचा विद्यापीठाला अभिमान आहे. महावितरण व विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल असे कुलगुरू प्रा. सुतावणे यांनी सांगितले.