युनुस तांबोळी
शिरूर : ढोल ताशाचा गजर अन पालखीची मिरवणूक, मंदिराला फुलांची सजावट अन सुंगधित अगरबत्ती धुपा बरोबर श्री मल्लिकार्जून देवाला बेल, फुले अर्पण करत नैवेद्य देऊन ‘हर हर महादेव’ची गर्जना करत भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग, हरिनाम, भजन, किर्तनात रंगलेले भाविक, खिचडीचा आस्वाद घेत विविध कार्यक्रमांचा आनंद घेत मलठण ( ता. शिरूर ) येथील श्री मल्लीकार्जून देवाची महाशिवरात्र यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली.
शुक्रवार (ता. १७ ) संगीत भजनाने या यात्रेस प्रारंभ झाला. शनिवार ( ता. १८ ) पहाटे महाअभिषेक करण्यात आला. सकाळी सवाद्य निघालेली हारतुरे आणि मिरवणुक आकर्षक ठरली. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.
मंदिरावर विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विकास दंडवते, निलेश दंडवते, अशोक दंडवते, नितीन दंडवते, भरत दंडवते, अभिषेक दंडवते यांनी भावीकांना मोफत खिचडीचे वाटप केले.
मंदिराभोवती लहान लहान उद्योग व्यवसायिकांनी गर्दी केली होती. सकाळपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शौकीनांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.
पोपट शिंगाडे, संभाजी निचीत, बाळासाहेब शेळके, रामदास दंडवते यांनी शर्यतीचे समालोचन केले. भाऊसाहेब शिंगाडे व दत्तात्रेय गायकवाड यांनी अचुक घड्याळाचे नियोजन केले होते. सायंकाळी बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वाटप होणार असल्याचे संदिप गायकवाड यांनी सांगितले.
सायंकाळी श्री पालखीची मिरवणुक तसेच शोभेचे दारूकाम करण्यात येणार आहे. रात्री गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा अॅार्केष्टाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार ( ता. १९ ) शिवजयंतीनिमित्त शिवज्योतीची मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येईल. अंतिम ‘मलठण केसरी’ ११ हजार १११ व गदा देण्यात देण्यात येणार आहे. रात्री मंगला बनसोडे लोकनाट्या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.