मल्हार पांडे
पुणे: बहुतांश लोकांना फायनान्स आणि आकडेवारी कळत नाही, याचा फायदा विरोधक घेतात आणि त्यांची दिशाभूल करतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न. आज (दि. १२) सकाळीच शिवसेनेच्या ट्विटर हॅन्डलवरून एक फेक बातमी देण्यात आली आहे. महाराष्ट्राला कर वाटपात फक्त ८८२८ करोड रुपये मिळाले, तर युपी आणि बिहारला २५००० कोटी आणि १०००० कोटींच्या सुमारास कर वाटप रक्कम मिळाली आहे.
मुळात, बहुतांश जनतेला हे माहित नसेल की, कर वाटपाचा एक फॉर्म्युला ‘फायनान्स कमिशनने ठरवला आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे एकूण कर संपादनाच्या ४१% रक्कम ही सर्व राज्यांमध्ये वाटली जाते. ही रक्कम समसमान किंवा कोणतं राज्य किती टॅक्स देत आहे यावर ठरत नाही, तर एकूण त्या राज्याची आर्थिक स्थिती, दर डोही उत्पन्न, त्या राज्याचे फॉरेस्ट कव्हर, राज्याची लोकसंख्या, डेमोग्राफिक परफॉर्मन्स अशा विविध गोष्टींवर अवलंबून असते. इतका सखोल अभ्यास करण्याची मानसिकता उद्धव ठाकरे गटाच्या लोकांकडून मुळीच नाही.
नेमकं उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांना जास्त कर वाटप रक्कम का दिली जाते आणि महाराष्ट्राला कमी का? याचे उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊयात …! उदाहरणार्थ केंद्र सरकारला सर्व राज्यांकडून मिळून १०० रुपये मिळाले आहेत, तर त्यापैकी ४१ रुपये हे १५ व्या फायनान्स कमिशनच्या सूचनेनुसार सर्व राज्यांमध्ये वाटले जातात. हे पैसे वाटण्याचे नियोजन, हे त्या राज्याच्या आर्थिक स्थितीवर आधारित आहे.
२०२२-२३ साली प्रकाशित झालेल्या वार्षिक रिपोर्ट प्रमाणे बिहारचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न हे रुपये ५४, १११ इतके आहे, तर उत्तर प्रदेशचे ८३,६६४ इतके आहे. या तुलनेत महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न हे २,४२,२४७ व २,७२,००० इतके आहे. देशातील सर्वात जास्त प्रति व्यक्ती उत्पन्न असलेले राज्य हे गोवा आहे. जवळपास ५ लाखाच्या घरात असलेल्या गोव्याला सर्वात कमी कर वाटप रक्कम मिळते.
परंतु, फक्त प्रति व्यक्ती उत्पनाच्या आधारावर हे ठरवले जात नाही. त्यामध्ये वरील नमूद केलेल्या निकषांचा देखील वापर केला जातो. आता बिहार आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांची लोकसंख्या देखील जास्त आहे. खरंतर, महाराष्ट्र हा बिहारच्या तुलनेत लोकसंख्येने पुढे असला, तरी महाराष्ट्राचे प्रति व्यक्ती उत्पन्न हे बिहारच्या तुलनेत जास्त आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या तुलनेत या दोन्ही राज्यांची प्रगती कमी आहे.
राज्यांच्या प्रगतीमध्ये शैक्षणिक स्तर, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रम असे सर्व निकष गृहीत धरले जातात. या सर्व गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश व बिहारच्या तुलनेत कैकपटीने पुढे आहे आणि म्हणूनच आपल्या राज्यात या दोन राज्यांच्या तुलनेत कमी कर वाटप रक्कम येते.
परंतु, केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्राला उत्तर प्रदेश व बिहारच्या खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र या राज्यांच्या पुढे जाऊ शकतो, स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतो, या राज्याच्या लोकांमध्ये जास्त पैसे कमावण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूस सक्षम असून शेतकरी कष्ट करून स्वतःची उपजीविका भागवत आहे. ही गोष्ट कदाचित उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांना पचनी पडत नसावी. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र सारख्या राज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि अनेक राज्यांच्या तुलनेत प्रचंड सक्षम आहे.
खरंतर सगळीच राज्य ही भारत मातेच्या लेकरांप्रमाणे आहेत. संपूर्ण कुटुंबात दोन लेकरं दुर्बल असतील, तर आई त्यांच्याकडे जास्त लक्ष देते आणि त्यांना सुदृढ बनवण्यासाठी प्रयत्न करते. हीच गत उत्तरप्रदेश आणि बिहारची आहे. महाराष्ट्र हे या मोठ्या कुटुंबातील एक सुदृढ आणि सक्षम लेकरू आहे. एवढी साधी आणि सुंदर संकल्पना या लोकांच्या बुद्धीला झेपत नाही, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.
आज, भारत देश युके सारख्या देशाला मागे टाकत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून स्वतःला स्थापन करत आहे. आणि यामध्ये आपल्या राज्याचा प्रचंड मोठा वाटा आहे. याचा अभिमान सामान्य जनतेला निश्चित आहे. हाच अभिमान जरा कोत्यामनोवृत्तीच्या बाहेर येऊन उद्धव ठाकरे गटाने बाळगावा, ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !