पुणे: राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) वाहन नोंदणी, नूतनीकरण, मालकी हस्तांतरण ही कामे ठप्प झाली आहेत. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वाहन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहन परवाना नूतनीकरण, हस्तांतरण हे मुदतीत केले नाही, तर दंड आकारण्यात येतो. वाहन प्रणालीमध्ये वारंवार अडथळे येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे दंड भरावा लागत आहे. मात्र, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, वाहन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही कामे कोलमडली आहेत.
एकाच वेळी राज्यभरातून लाखो अर्ज येत आहे. सर्व्हरवर ताण पडल्याने एनआयसीने गेल्या महिन्यात दहा दिवस ही प्रणाली बंद ठेवली होती. आता पुन्हा या प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला आहे. वाहन प्रणालीत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार एनआयसीकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.