पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्याची बातमी समोर येत आहे. हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके पुण्यातील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.
अमोल बालवडकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. उमेदवारी न दिल्यास बंडखोरीच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले होते. अशातच आता भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या मेहुण्याच्या घरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे.
दरम्यान, अभिजीत कटके हा पुण्यातील शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतने यापूर्वी एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे. पैलवान अभिजीत कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमार केली आहे.