Maharashtra Monsoon Update : उकाड्याने आणि कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. तसेच विहीरी अटू लागल्या असून पिके जळू लागल्याने शेतीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
यंदा राज्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडणार
हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. त्याचबरोबर यंदा राज्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. (Maharashtra Monsoon Update) सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.
त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे.
दरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या १ जून रोजी मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update) तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.