पुणे (Pune): तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात नियमांची पायमल्ली केल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय राज्य शासन आता धर्मादाय रुग्णालयांबाबतचे नियमही बदलणार आहे. रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा नियमही बनवण्यात येणार आहे.
रुग्णालय प्रशासनाने पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने प्रत्येक अहवालानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात ‘आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दीनानाथ रुग्णालय धर्मादाय निधीमध्ये पैसे शिल्लक असूनही भिसे कुटुंबीयांकडे डिपॉझिट मागितले होते. धर्मादाय अंतर्गत रुग्णावर उपचार केले
नाहीत, असा ठपका धर्मादाय सहआयुक्त आणि विधी व न्याय विभागाच्या अहवालाच्या आधारे डॉ. घैसास आणि रुग्णालयावर ठेवण्यात आला होता.
राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय धर्मादाय रुग्णालय असल्याने पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त डॉ. रजनी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती.