पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात घडलेल्या ड्रग्ज व त्यासंबंधित घटनांच्या चौकशीसाठी डॉ. दिलीप म्हैसेकर (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. या समितीमध्ये सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या न्यायवैद्यक शास्त्रविभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईचे डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश. या समितीला सखोल चौकशी करून पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करायचा आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयात ड्रग्स तस्करी प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखा विभागाने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थ जप्त केले होते. सुमारे दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे म्हणजे एमडी ड्रग्स होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांना तुरी देऊन ललित पाटील फरार झाला. त्यानंतर ससून रुग्णालय हे संशयाच्या भोवऱ्यात आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात या घडलेल्या प्रकारानंतर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढे जाऊन धंगेकर यांनी ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये महिला पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता या प्रकरणाची सविस्तर आणि सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.