पुणे: महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे, जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे, असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्राला संपवण्याती सुरूवात न्हावा शेवा शिवडी सीलिंकमुळे झाली आहे. रायगडचं वाटोळं होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून आहे. आतापर्यंत जी आक्रमन झाली त्यांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. भूभाग अतिशय हुशारीने विकत घेतला जातो. बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतात आणि मालक होतात. असे राज ठाकरे म्हणाले. या दरम्यान, त्यांनी बुलेट ट्रेनवरही भाष्य केलं. बुलेट ट्रेनची गरज काय हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रपये कशाला खर्च करायला पाहिजे? असा प्रश्नही राज यांनी यावेळी विचारला.
मध्यमवर्गीय समाजाने राजकारणात येणे गरजेचे आहे. राजकारण असो वा समाजकारण असो त्यामध्ये मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, आज जे काही जातीपातीच्या नावावर सुरू आहे त्यामागे कुणीतरी वेगळेच आहेत असं राज ठाकरे म्हणाले.