पुणे : लोकसभेला ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं, आता विधानसभा निवडणुकीत मला खुश करा, साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना गावकऱ्यांना म्हणाले. या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती ग्रामीण भागामध्ये गावभेट दौरा करत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी आपल्या गाव भेट दौ-याला सुरुवात केली आहे. अजित पवार आज तब्बल बारामती तालुक्यातील 27 गाव भेट दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्याचा दौरा करताना सावळे येथील एका सभेत बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्व योजना सुरू ठेवायच्या असतील तर घड्याळ बटन दाबा. पवार साहेब यांच्यानंतर काम करणं अवघड होतं. परंतु मी विकास कामात अधिक भर घातलीय. आता शेतीसाठी वीज रात्रीची नव्हे तर दिवसा देणार आहे. सौरऊर्जा ज्यास्तीत राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याने दिवसभर काम करायचे आणि रात्री निवांत झोपायचे, असं चित्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात हाय होल्टेज समजल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठिंब्याने उभे ठाकले आहेत. तर दोन्ही बाजूने प्रचाराला सुरुवात झाली असून, त्यांच्याकडून गावोगावी, वाड्यावस्त्यांवर जात नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला जात आहे.