पुणे : आज महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्टाचे तिस-यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आज त्यांचे मंत्री शपथबद्ध होत आहेत. नागपूरमधील राजभवन परिसरात तब्बल 33 वर्षानंतर मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे. यावेळी भाजपाला मुख्यमंत्र्यांसह 19, शिवसेनेला उपमुख्यमंत्र्यांसह 12 आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्रीपदांसह 39 मंत्री विधानसभा सभागृहात शपथ घेत आहेत.
दरम्यान, पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांची महायुती मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकीटाला भाजपमधून विरोध करण्यात आला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी तो विश्वास सार्थ करत विजय मिळवला. भाजपकडून पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला असून आज त्यांनी नागपूरमध्ये राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. मात्र, मिसाळ यांनी तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली. पुणे भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं व्यक्तीमत्व, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले सतिश धोंडिबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत.
राजकीय कारकीर्द…
-माधुरी मिसाळ यांनी कॉमर्समधून पदवी मिळवली आहे. त्यांनी 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर 2009 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्या आमदार म्हणून निवडून आल्या.
-2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं वारं होतं. त्यावेळी माधुरी मिसाळ यांनी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं होतं. त्या 70 हजारापेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या.
-2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पवर्ती मतदारसंघातून तब्बल 22 नगरसेवक निवडून आणले आहेत.
-2019मध्ये माधुरी मिसाळ या सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
माधुरी मिसाळ यांची कारकिर्दीतील महत्वाची कामे…
-पुणे मेट्रोला मान्यता
-स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी विशेष प्रयत्न
-स्वारगेट चौकात ट्रान्सपोर्ट हब
-स्वारगेट चौकातील उड्डाणपूल पूर्ण
-सिंहगड रस्ता उड्डाणपूल मान्यता
-स्वारगेट-कात्रज बीआरटी सक्षमीकरण
-बिबवेवाडीत अण्णा भाऊ साठे नाट्यगृह
-ससूनच्या धर्तीवर बिबवेवाडीत 500 खाटांचे रुग्णालय
-पंधराशे ससार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती
-पर्वती पर्यटनासाठी 12 कोटी रुपये
-मार्केट यार्ड परिसराचा सुनियोजित विकास
-पु. ल. देशपांडे उद्यान निर्मिती फेज 2
-पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे काम सुरू