पुणे: पुणे – नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली आहे. तसेच सदर द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास देखील शासन मान्यता देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पुणे – नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला होता.
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, व नाशिक या तीन प्रमुख जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. पुणे, अहमदनगर व नाशिक ही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे असून कृषी, अवजड उद्योग, लघु व मध्यम उद्योग, आयटी कंपनी इत्यादीच्या दृष्टीने महत्वाची शहरे आहेत. मुंबई-पुणे- नाशिक ही शहरे महाराष्ट्रातील सुवर्णत्रिकोणाचा भाग आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जातील व महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण होईल. प्रस्तावित आखणी रेषेवरील सर्व शहरे व आसपासच्या प्रदेशाची आर्थिक व पर्यायाने सामाजिक उन्नती अधिक गतीमानतेने होऊ शकणार आहे.
प्रस्तावित महामार्गाची आखणी रेषा राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव,संगमनेर आणि सिन्नर अशा महत्वाच्या शहराजवळून प्रस्तावित आहे. या भागाचा विकास शीघ्रगतीने होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित महामार्ग हा महत्वाचा टप्पा ठरेल. सदर महामार्गामुळे मोठे उद्योग, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्र महामार्गालगत नव्याने विकसित होवू शकतील व त्यामुळे स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सदर महामार्गामुळे पुणे-नाशिक हा प्रवास सद्य:स्थितील ५ तासावरून साधारणतः २ ते २.५ तासावर येईल. दळणवळण गतीमान झाल्याने पुणे, नाशिक शहरामधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था या उद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे.