-विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : शिरुर-हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांना खास श्रावण मासात महाकालेश्वर(उज्जैन) दर्शन घडावे ही धार्मिक खंत लक्षात घेऊन, शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा सेनेचे शिरुर-हवेलीचे निवडणूक समन्वयक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या वतीने महाकालेश्वर(उज्जैन) मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिरुर-हवेली नागरिकांच्या यात्रेसाठी स्वतंत्र रेल्वेचे बुकिंग करण्यात येणार आहेत. यात्रेत सहभाग नोंदविण्यासाठी नोंदणी शिरूर-हवेली दोन्ही तालुक्यात सुरु आहे. यामध्ये वाघोली, शिरूर शहर, कुंजीरवाडी, थेऊर फाटा चौक, मांडवगण फराटा, शिक्रापूर, न्हावरा या गावांमध्ये यात्रेच्या बुकिंग अर्जांची व्यवस्था नागरिकांसाठी कटके यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. महाकालेश्वर(उज्जैन) दर्शन यात्रेचा जास्तीत जास्त लाभ शिरूर-हवेली तालुक्यातील इच्छुक नागरिकांना घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपूर्वी याच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी वाघोली-आव्हळवाडी जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांना स्वंत्रत रेल्वे बुकिंग करीत मोफत अयोध्या, वाराणसी, काशी आदी धार्मिक अशा प्रकारे मोठ्या पवित्र धार्मिक स्थळांचे दर्शन घडविले आहे. असा धार्मिक समाजसेवेचा उपक्रम त्यांनी पुढे चालू ठेवला. यावेळी येत्या श्रावण मासात महाकालेश्वर(उज्जैन) दर्शन घडविणार आहे. शिरूर-हवेली तालुक्यात आधुनिक श्रावणबाळ म्हणून कटके यांचे नाव पुन्हा जोरदार चर्चेत आले आहे.