पुणे : अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांबाबत एक गीत लिहिले आहे. विशेष म्हणजे हे गीत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायले आहे. हे गीत लवकरच रामभक्तांच्या भेटीला येईल, असे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितले आहे.
याविषयी माहिती देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलं आहे. प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या गायानामध्ये माझा देखील सहभाग आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पुण्यात आज ‘वॉक फॉर नेशन’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वॉकेथॉनला उपस्थित आहेत. फर्ग्युसन कॉलेजमधून ही वॉकथॉन सुरू होणार आहे. या वेळी बोलताना अमृता यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. ही सुखाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळे राम मंदिर झालं आहे. सगळ्या राम भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.