पिंपरी : पिंपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे अमिष दाखवून एका १४ वर्षीय मुलीला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जाधववाडी चिखली येथून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २० ओक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या ३३ वर्षीय नातेवाईकाने चिखली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान, बीट मार्शलने पाठलाग करून अल्पवयीन मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली आहे. या कामगिरीबाबत चिखली पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वसीम अब्दुलकरीम शहा (वय-२२, रा. कोहिनूर कॉलनी, रुपीनगर, जाधववाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी हि फिर्यादी यांची नातेवाईक आहे. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी वसीम याने लग्न आणि संसाराचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला टेम्पोतून पळवून नेले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यानी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिखली पोलिसांनी आरोपीच्या टेम्पोचा नंबर आणि माहिती वायरलेस द्वारे सर्व पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली.
दरम्यान, दिलेल्या माहितीच्या आधारे टेम्पो बावधन पोलिसांच्या बीट मार्शलच्या निदर्शनास आला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. मात्र टेम्पो वेगात असल्यामुळे तो त्यांच्या हाती लागला नाही. शिरवळ येथील परिसरात रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे तेथील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यावेळी बावधन पोलिसांनी आपली दुचाकी टेम्पोला आडवी घालून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच अल्पवयीन मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. या कामगिरीबाबत चिखली पोलिसांचे कौतुक केले जात आहे.