पुणे : पुण्यात आता जनावरांना होणाऱ्या लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लसीचे उत्पादन होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या या लसीचे तंत्रज्ञान सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे (आयव्हीबीपी) नुकतेच हस्तांतरित करण्यात आले. त्यानुसार ‘लम्पी प्रोव्हॅक’या लसीचे १० वर्षे व्यावसायिक उत्पादन घेण्याचे अधिकार राज्याला मिळाले आहेत. नोव्हेंबरपासून या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तसेच देशात सुरुवातील पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेला लसीचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे, अशी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली आहे. राज्यात एक कोटी ४० लाख गोवंशातील जनावरे आहेत. त्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासोबतच बाकी राज्यांनाही ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लम्पी आजार रोखण्यात मदत होणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) हरियाणातील हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र (एनआरसीई) आणि उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएआर) या संस्थांनी संयुक्तपणे या लसीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
दरम्यान, नागपूर येथे गेल्या आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेस हस्तांतर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.