पुणे : पुण्यातील मुंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी सोशल मिडियाचा योग्य वापर करून हरवलेली मुलगी तासाभरात आईकडे सुपूर्द केली. यामुळे मुंढवा पोलीसांच परिसरात नागरिकांकडून कौतुक होत आहे. मुलगी सापडल्याने मुलीच्या आईने सुटकेचा निश्वास सोडला.
नेमकं काय घडल?
केशवनगर बिट मार्शल यांना १ मार्च रोजी मांजरी परिसरातील एसएनबीपी स्कुल येथून एका महिलेचा कॉल प्राप्त झाला होता. एक चौदा वर्षाची मुलगी सिध्दी बिल्डींगच्या पार्किंगमध्ये मिळुन आल्याचे कॉलरने सांगितले. कॉलच्या पुर्ततेकामी बिट मार्शल रवाना झाली. कॉलचा फोटो पोलिस ठाण्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. त्यावेळी मुंढवा पोलिस ठाण्यात एक महिला या देखील त्यांची मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी आल्या होत्या.
पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदुल यांनी त्यांच्याकडे विचारपुस केली. तसेच मुलीचा फोटो घेवून केशवनगर बिट मार्शलला पाठवून खात्री करण्याबाबत सांगितले. प्राप्त झालेल्या कॉलमधील मुलगी आणि पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरिता आलेल्या तक्रारदाराची मुलगी ही एकच असल्याची खात्री झाली.
मुंढवा पोलिसांनी तासाभराच्या आतच हरवलेल्या मुलीची तिच्या आईसोबत भेट घडवून आणली. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल मुलीच्या आईने पोलिसांचे आभार व्यक्त केले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, पोलिस अंमलदार सचिन अडसुळ, प्रविण कोकणे, स्नेहल शिंदे यांनी केली.
मुंढवा पोलिसांकडून सोशल मिडियाचा योग्य वापर
मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस ठाण्याच्या स्तरावर चौकी तक्रार, डायर 112, कंट्रोल रूम पोलिस मदत कॉलची वेळेत पुर्तता होणे, वेळेत पोलिस मदत मिळण्याकरिता वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून ग्रुपवर सर्व कॉलची तसेच तक्रारींची माहिती शेअर करून वेळेत पुर्तता केली जाते.