योगेश शेंडगे
शिक्रापूर : मारुती सुझुकी कंपनीच्या नवीन स्विफ्ट कारचे लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कार लॉचींग करणे चांगलेच अंगलट आले आहे. वाहतूक शाखेने २ हजारांचा दंड आकारल्याने लॉचींग करणे शोरूमच्या कर्मचाऱ्यांना भोवले आहे.
वाघोलीतील एका मारुती सुझुकी कंपनीच्या शोरूमचे काही कर्मचारी नवीन स्विफ्ट कारच्या लॉचींगसाठी बुधवारी २२ मे रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कार घेवून गेले. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, फोटो काढून कारचे लॉचींग करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीनंतर वाहतूक शाखेकडून दोन हजाराचा दंड आकारण्यात आला.
दरम्यान, कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नुकतीच दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईमुळे जनसामान्यांमध्ये पोलीसांबाबतची विश्वासर्हता कमी होत आहे. त्यातच लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा आत्मदहनासारख्या प्रकारामुळे पोलीस स्टेशनची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. त्यातच बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये झालेली स्विफ्ट कारची लॉचींग हा जनसामन्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. खरचं कार लॉचींगसाठी आणली होती की एखाद्या अधिकाऱ्याला गिफ्ट देण्यासाठी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संबधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेविरुद्ध नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ अन्वये कडक कारवाई करावी.
अशोक भोरडे, (सामाजिक कार्यकर्ते)
नवीन गाडी आल्यानंतर फीचर्स समजावून सांगायला सरकारी कार्यालय किंवा इतर ठिकाणी जात असतो. अशाच पद्धतीने पोलीस स्टेशनला गेलो. गाडी रस्त्यावर येण्यासाठीची परिवहन विभागाचा जो मापदंड आहे, त्याचे सुद्धा पालन केले आहे.
अतुल खोडे, (मॅनेजर, मारुती सुझुकी शोरूम, वाघोली)
सर्वांसाठीच कायदा समान आहे. नंबर प्लेट दिसत नसल्याने महाराष्ट्र वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला आहे.
गजानन जाधव, (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)