वाघोली, (पुणे) : पुण्यात हिट अँड रनचे प्रकार थांबण्याचे नाव घेईना. कल्याणीनगर पाठोपाठ आता लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार घडला आहे. दुचाकीवरून येणाऱ्या तीन तरुणांना भरधाव कारने जोरदार धडक दिली आहे. या घटनेत तीनही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास लोणीकंद परिसरातील कोलते वेअर हाऊसच्या समोर घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत कुमार जयसिंग ढोरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चालक नवनाथ चोरमले (रा. शिरसवडी, ता. हवेली, पुणे) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार ढोरे आणि त्याचे दोन मित्र नवनाथ ज्ञानेश्वर हरगुडे, विनायक ज्ञानेश्वर ढोरे हे पुणे-नगर रोडवरील लोणीकंद येथील शौर्यवाडा हॉटेल येथे रात्री जेवण करून होंडा एक्टिवा स्कूटरने सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कोलते वेअर हाऊस समोरून जात होते. त्यावेळी केसनंद कडून लोणीकंदच्या दिशेने जाणारी भरधाव कारने जोराची धडक दिली.
या अपघातात कुमार ढोरे यांच्या उजव्या पायाला मांडीमध्ये दोन ठिकाणी फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले आहेत. तर दुचाकी चालक विनायक ढोरे आणि नवनाथ हरगुडे या दोघांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले आहेत. जखमींना खराडी येथील मनीपाल रुगणालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीला घेतले ताब्यात; नातेवाईकांचा गंभीर आरोप
दरम्यान, या अपघात प्रकरणातील कारमधील मद्यप्राशन केलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील डोंगरगाव येथील गायकवाड नावाचा व्यक्ती आरोपी असल्याचे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. तरीदेखील पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीला आरोपी केल्याचा आरोप, तसेच पोलिसांनी योग्य वागणूक दिली नसल्याचा गंभीर आरोप अपघातग्रस्त यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी आरोपी नवनाथ चोरमले यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा हा गुन्हा त्यांनी केला नसल्याचे आणि गुन्हा अंगावर घेण्यासाठी डोंगरगाव येथील गायकवाड नावाच्या व्यक्तीने दबाव टाकल्याचे चौकशीत समोर आले आहे.