Loni Kalbhor : लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत, सत्तेत सहभाग घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. जिल्ह्यातील सत्तासमीकरणे बदलत आहेत. शरद पवार की अजित पवार, हा संभ्रम अद्याप हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा झाला अभिमन्यू
अजित पवार यांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपण नेमक कोणासोबत जायचे, यासाठी हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पडद्याआड अनेक बैठका, चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला असून, चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हाच मोठा प्रश्न आहे.(Loni Kalbhor) सत्ता नाट्यामुळे हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत.
राज्यात भाजप व शिंदे गट यांच्या शिवसेना पक्षाला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. भाजप व शिंदे यांच्या शिवसेना गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आपल्या आमदारांसह दाखल झाले आहेत. यापूर्वी अजित पवार यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले होते; मात्र ते बंड काही काळापुरते मर्यादित राहिले होते. आता तर त्यांना इतर दिग्गज आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी दरी निर्माण झालेली आहे. (Loni Kalbhor) या बंडाळीमुळे काही कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, तर काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आपण कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच शरद पवार हे बंड गेल्या वेळेप्रमाणे शांत करतील, असा विश्वासही काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेताच; राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांसोबत बाहेर पडला आहे. तर, जे शरद पवार गटात राहणार आहेत, त्यातील अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, या दोन्ही गटातील वाद संपून पुढील काही महिन्यांत हे दोन्ही गट एकत्र येतील या आशेवर हवेली तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी नेमकी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगासमोर गेल्याने शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांचे संघटन निश्चित करण्यासाठी “मी शरद मित्र’ या नावाने पुणे शहरात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. हवेली तालुक्यात मात्र असे काहीही घडले नाही.(Loni Kalbhor) दरम्यान, पक्षात उभी फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गट एकत्र येऊन हा वाद संपेल अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे आपण कोणासोबत हे अनेकांनी स्पष्ट केलेले नाही.
या राजकीय लढाईत अनेक इच्छुक उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. ज्यांना आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांची या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठी पंचाईत झाली आहे. शरद पवार गटात जावे तर तेथे काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी आघाडी करून निवडणूक लढवावी लागेल. जागा वाटपात आपला जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समितीचा गण दुसऱ्या पक्षाकडे गेला तर काय करायचं? तशीच परिस्थिती अजित पवार गटात गेल्यास, तेथे भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करावी लागेल. आणि जागा वाटपात आपला जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गण दुसऱ्या पक्षाकडे गेला तर काय करायचं? या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते सध्या “ठंडा करके खाओ” या मूडमध्ये आहेत. सध्या शांत राहू, निवडणूक जवळ आल्यावर ठरवू काय करायचं ते, अशा मानसिक स्थितीत नेते, कार्यकर्ते आले आहेत.
अजित पवारांच्या धक्कातंत्राने सुरवातीला वेगळा निर्णय घेतलेल्या शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे व शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय मतदारसंघातील पक्षाची नेतेमंडळीं, कार्यकर्त्यांना कितपत रुचला आहे हे समजण्यास सध्या तरी काही मार्ग नाही. एखादी निवडणूक झाल्यानंतरच हा निर्णय बरोबर की चूक हे समजणार आहे. त्यामुळे एकदंरीत साहेब की दादा? या विवंचनेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पडल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीमध्ये सुरवातीला काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेली अनेक वर्षे या सर्व सत्तेची सूत्रे अजित पवारांच्याच हातात होती. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, सदस्य व पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य अशा महत्त्वाच्या पदांपासून थेट कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचे अजित पवार यांच्याशी थेट संबंध होते. त्यामुळे हि सर्व मंडळी अजूनही अजित पवार यांच्याच पाठीमागे आहेत. (Loni Kalbhor) मात्र काही पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी सावध पवित्रा घेऊन थेट भूमिका घेणे टाळले आहे. चित्र स्पष्ट झाल्यावर भूमिका स्पष्ट करू असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी नक्की कोणासमवेत असेल ? हे स्पष्ट व्हायला काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे.
सध्या हवेली तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रामुख्याने सामनाही याच दोन पक्षांत रंगण्याची शक्यता आहे. आता मात्र थेट अजित पवार भाजपसमवेत आल्याने दोन्ही पक्षांतील विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुकांची राजकीय अस्वस्थता वाढली आहे. या दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसमोर आपले नक्की काय होणार, असा मोठा प्रश्न पडला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप-सेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट एकत्र येऊन निवडणुका लढविणार असेल, तर प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुकांना घरी बसावे लागू शकते. अशा वेळी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) तसेच मनसेच्या गळाला अनेक इच्छुक लागू शकतील. मात्र, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? यावरही अनेक गणिते अवलंबून असणार आहेत.
अजित पवार यांच्या थेट भाजप-सेनेसमवेत जाण्याच्या निर्णयाने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवारांना मानणारा मोठा गट भाजपसमवेत निवडणुकीत एकत्र आल्यास महाविकास आघाडीला फटका बसेल. (Loni Kalbhor) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला अजित पवार यांचा फायदा होणार असून, काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्हींना त्याचे परिणाम सहन करावे लागतील, अशी शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल