लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लोणी काळभोर शाखेने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात छापा टाकून सुमारे १७ हजारांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय ३३, रा, मांजरी ग्रीन वूड वसाहत, शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, श्रीकांत बाळासाहेब आवारे व गणेश राजेंद्र आवारे (दोघेही, रा. फुले नगर, माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रसाद नरवडे हे महावितरणाच्या लोणी काळभोर शाखेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लोणी काळभोर शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकांकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी. डी. ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्याचे आदेश महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिले.
महावितरणचे सुमारे १७ हजारांचे नुकसान
लोणी काळभोर शाखेचे सहाय्यक अभियंता व कर्मचारी हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील वीज बिल वसूली करत होते. तेव्हा श्रीकांत आवारे हे वीज चोरी करून वापरत असल्याचे दिसून आले. श्रीकांत आवारे यांनी महावितरणचे सुमारे १५ हजार ८४० रुपयांचे नुकसान केले. तर गणेश आवारे यांनी वीजचोरी करून महावितरणचे २ हजार रुपयांचे नुकसान केले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी रामप्रसाद नरवडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे व पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.