लोणी काळभोर : गेल्या आठ दिवसांपासून लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police ) अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol) करणाऱ्याच्या ठिकाणी छापे टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ जणांवर गुन्हे दाखल करून २० हजाराहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अनंद हरिभाऊ काळभोर (वय-36 रायवाडी, लोणी काळभोर), सुरेश रूपा बिरे (वय-65, सिद्राम मळा, लोणी काळभोर), रंजना भगवत शिंदे (माळी मळा, लोणी काळभोर), चंद्रकांत शंकर वाघमारे (वय-38 कोलवडी, ता. हवेली), संभाजी चंद्रसेन काळे (वय-24, केसकर वस्ती कुंजीरवाडी), राकेश कुंभार श्री परमेश्वर आदिवासी मैत्री (वय-40 रा. वडकी, हवेली), जीवन लक्ष्मण रमालावत (वय-42 रा. वडकी, ता. हवेली) व अमोल भीमराव नेटके (उरुळी देवाची, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंजीरवाडी, लोणी काळभोर, वडकी व उरुळी देवाच्या परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले होते.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने विविध पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. तेव्हा वरील आठ आरोपी अवैध दारू विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजाराहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ८ जणांच्या विरोध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.