लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील निसर्ग हॉटेलवर विदेशी दारुची विनापरवानगी विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत शुक्रवारी (ता.7) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या छाप्यात १७५० रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र राजकुमार राठोड (वय १९, धंदा -हॉटेल व्यवसाय, रा. हॉटेल निसर्ग, एच. गेट नं. ०३ समोर, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत सदाशिव कळसकर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित साळुंखे व वीर हे दोघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील निसर्ग हॉटेलवर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती त्यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा एक इसम विदेशी दारू विनापरवानगी विकत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी देशी स्टॅगोच्या ९० मिलीच्या ५० सिलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. तर नरेंद्र राठोड याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.