लोणी काळभोर, ता. 7 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदीरा नगर येथील पाण्याच्या टाकी जवळ खुलेआम सुरू असलेल्या सोरट जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ०6 ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगार खेळणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रकांत कुरलिंगाप्पा बिराजदार (वय ४६, रा. सध्या मांजरी बु.ता. हवेली जि.पुणे व मुळ पत्ता मु.पो. कमलानगर, ता. औराद, जि. बदर कर्नाटक), रोहीत सतिष नवघण (वय २४, रा. म्हसोबा मंदीराचे जवळ, काळेपडळ, हडपसर पुणे मुळ पत्ता मु.पो. माळशिरस, जि. सोलापुर) व जावेद महरूम इजार शेख (वय ३४ , रा. इंदीरा नगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदीरा नगर पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या काही नागरिक सोरट जुगार खेळत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, त्यावेळी चंद्रकांत बिराजदार, रोहीत नवघण व जावेद शेख हे जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी या छाप्यात जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर तिघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधि. क. १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा हजारे करीत आहेत.








