पिंपरी-चिंचवड: पावसाळ्याची सुरुवात होताच पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळपासूनच जोरदार सरींचा जोर अनुभवायला मिळाला. काहीच मिनिटांत पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भाग जलमय केले असून, हिंजवडी आयटी पार्कचा परिसर अक्षरशः वॉटर पार्कमध्ये रूपांतरित झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

हिंजवडी परिसर हा देशातील एक महत्त्वाचा आयटी हब मानला जातो, जिथे दररोज हजारो कर्मचारी ये-जा करतात. मात्र, आज सकाळी अवघ्या काही मिनिटांत कोसळलेल्या पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. हिंजवडी परिसरात अनेक ठिकाणी इतकं पाणी साचलं की दुचाकी वाहने थेट प्रवाहात वाहून गेली, तर काही चारचाकी वाहने अक्षरशः अर्धवट पाण्यात बुडालेली दिसून आली. अनेक कर्मचार्यांना कार्यालय गाठताना अडथळ्यांना सामोरे जावं लागलं, तर काहींना परत जावं लागलं.


या परिस्थितीबद्दल स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त आहेत. “पावसाळ्याआधी ड्रेनेज लाईन आणि नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यामुळे ही स्थिती उद्भवली,” असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी न साचता वाहून जाण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा कार्यरत नसल्याने दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. हिंजवडीतील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी या परिसराला “वॉटर पार्क हिंजवडी” अशी उपमा दिली आहे. विशेषतः कार्यालयाकडे निघालेले कर्मचारी आणि रहिवाशांनी सोशल मीडियावरून प्रशासनाला खडसावले आहे.
प्रगत आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वर्षा ऋतूमध्ये दरवर्षी अशा समस्यांना सामोरे जावं लागतं हे दुर्दैवी आहे. पावसाच्या पहिल्याच दिवशी निर्माण झालेली ही स्थिती भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतानाच, स्थानिक प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.







