लोणी काळभोर : इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी केल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात नुकतीच घडली होती. या चोरीचा व्हिडिओही प्रचंड व्हारयल झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्याची उकल अवघ्या 12 तासांच्या आत करून दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
उबेद सिराज मुजावर (वय 21, रा. फ्लॅट नं. 503, विवांता बिल्डींग, एम. आय. टी. कॉर्नर, कदमवाकवस्ती ता. हवेली, मुळ रा. मुजावर वाडा, खेड शिवापुर ता. हवेली जि. पुणे) यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबेद मुजावर हा लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ते एमआयटी कॉर्नर जवळील विवांता बिल्डींगमध्ये राहत आहेत. उबेद मुजावर यांना त्यांच्या वडिलांनी सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची मोटार सायकल घेऊन दिली होती.
दरम्यान, उबेद मुजावर यांनी शुक्रवारी (ता.19) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. तेव्हा पार्किंगमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन मुले फिर्यादी उबेद मुजावर यांच्या दुचाकीजवळ आली व त्यांनी दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी उबेद मुजावर यांनी सोमवारी (ता.22) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, संबंधित दुचाकी चोरी करणारी मुले इराणी वस्ती येथे थांबलेली आहेत, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही मुलांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, दोन्ही मुले ही अल्पवयीन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच दोन्ही मुलांनी सदर गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार गणेश सातपुते, प्रदीप गाडे, योगेश पाटील, सुरज कुंभार यांच्या पथकाने केली आहे. दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या बारा तासांच्या आत उकल केल्याने लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.