लोणी काळभोर, ता. 5 : थेऊर (ता. हवेली) परिसरात बुलेटचे सायलन्सर बदलुन मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज काढुन फटाके फोडणाऱ्या 4 बुलेटराजांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून थेऊरसह परिसरात काही इसम बुलेटमधून फटाके फोडत आहेत. अशी तक्रार पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाला संबंधित टवाळखोर बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी थेऊर परिसरातील कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी गाड्यांचा शोध घेऊन कारवाई केली आहे. या कारवाईत 4 बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 6 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार यांनी पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार घनश्याम आडके, ताम्हाणे, मयुर बोरावके, लोणी काळभोर वाहतुक शाखेच्या महिला पोलीस हवालदार सोफिया इनामदार यांच्या पथकाने केली आहे.
लोणी काळभोर परिसरातील कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया आवाज काढणाऱ्या बुलेटराजांवर करणार आहे.
-राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)