लोणी काळभोर : चोरीस गेलेल्या दोन दुचाकींचा शोध लोणी काळभोर वाहतूक शाखेने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लागला आहे. त्यामुळे लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने लोणी काळभोर हद्दीत बेवारस वाहनांची तपासणी करून वाहनांचे मुळ मालक यांचा शोध घेण्याचे आदेश लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी वाहतूक पोलिसांना दिले होते.
मिळालेल्या आदेशान्वये लोणी काळभोर वाहतूक शाखेचे हवालदार अनिल गायकवाड, पोलिस हवालदार चेतन सुलाखे, पोलीस शिपाई महेश मडके हे आज गुरुवारी (ता.23) नाकाबंदी करीत असताना, पोलिसांना एका दुचाकीस्वारावर संशय आला. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेऊन दुचाकीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, सदर दुचाकी ही चोरीची असल्याची उघडकीस आले.
मागील पाच दिवसांपूर्वी वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार काकडे यांना गृती हॉस्पिटल जवळ एक दुचाकी झुडपामध्ये पार्क केल्याचे दिसून आले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, सदर दुचाकी बेवारस असल्याचे समोर आले. त्यानंतर काकडे यांनी दुचाकीच्या वाहन क्रमांकावरून मालकास संपर्क केला. तेव्हा त्यांची दुचाकी एप्रिल महिन्यात चोरी झाल्याची माहिती समोर आली. तसेच या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दुचाकीच्या मालकांनी दिली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार सदरची दुचाकी लोणी काळभोर वाहतूक शाखा येथे आणली. त्यानंतर मुंढवा पोलीस ठाणे व तक्रारदार यांना संपर्क करून ती दुचाकी मुंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, एकाच आठवड्यात दोन चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. त्यामुळे लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.