लोणी काळभोर : कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीवरून चाललेल्या एका दुकानदाराला लुटल्याची घटना घडली होती. ही घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे पुलाच्या काही अंतर पुढे शिव मंदिराजवळ शुक्रवारी (ता.8) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून गुन्ह्यातील दुचाकीसह 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शुभम संजय धुमाळ (वय 23, रा. धुमाळ मळा, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), करण शंकर गावडे (वय 19, रा. नाईक आळी, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि.पुणे) व प्रविण राजाराम घोडके (वय 20, रा. मगरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास भाऊ शेंडगे (वय 32) चोरघे बस्ती, म्हातोबाची आळंदी, तरडे रोड, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास शेंडगे हे एक व्यावसायिक असून त्यांचे किराणा मालाचे व कपडे विक्रीचे दुकान आहेत. विकास शेंडगे हे त्यांच्या बुलेटवरून म्हातोबाची आळंदी रस्त्याने शुक्रवारी (ता.8) चालले होते. त्यांची दुचाकी रेल्वे पुलाच्या पुढे असलेल्या शिवमंदिराजवळ एका दुचाकीने कट मारून अडविली. त्यानंतर दुचाकीवरून तिघेजण उतरले. आरोपींनी फिर्यादी विकास शेंडगे यांना शिवीगाळ केली. व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट हिसकावुन खिश्यातील 1 हजार 700 रुपयांची रोकड काढून घेतली. व आरोपींनी जाताना फिर्यादी यांच्या बुलेटचे दगड मारून नुकसान केले.
याप्रकरणी विकास शेंडगे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 309(4), 126(2), 324(4), 351(2), 352 आर्म अॅक्ट क 4(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्यचा तपास करीत असताना, पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून तिन्ही आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी, 15 तोळयाचे चांदीचे ब्रेसलेट, कोयता व 700 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये रिमांड ठोठावली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.