Loni kalbhor News लोणी काळभोर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी थांबणार कि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पालखी तळावर थांबणार याचा निर्णय अजूनही झाला नसला तरी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी तळावर मात्र शेकडो कामगारांसह पालखीतळ सजविण्याचे काम युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे दिसुन येत आहे. (Loni kalbhor News)
जेसीबी, पोकलेन मशीन ८० हून अधिक कामगार कार्यरत
कदमवाकवस्ती ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पालखी तळावर जेसीबी, पोकलेन मशीन, ट्रॅक्टर, ८० हून अधिक कामगार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आदी सदर ठिकाणी तळ ठोकून आहेत.
आषाढी वारीसाठी जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १० जूनला प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त मंडळाच्या वतीने पालखी मार्गावरील मुक्कामाची ठिकाणे व विसाव्याची ठिकाणे यांचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमी वर लोणी काळभोर येथे पालखी सोहळा १४ जूनला ग्रामीण भागातील पहिला मुक्कामासाठी येत आहे.
पालखी सोहळा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार कि नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावरील काम मात्र जोरदार सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी आणायचा नाही, त्या ऐवजी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पालखी तळावर मुक्कामी थांबवण्याचा निर्णय पालखी सोहळा प्रमुखांनी घेतला आहे. जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचे सोहळा प्रमुख सांगत असले तरी लोणी काळभोर ग्रामस्थ पालखी गावात आलीच पाहिजे या निर्णयावर ठाम आहेत.