लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील शिवाई पार्क परिसरातील उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढलेल्या तरुणाला तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर खाली उतरवण्यात यश आले आहे. तब्बल अडीच तासांहून अधिक वेळ तो टॉवरच्या टोकावर जाऊन बसून होता.

प्रल्हाद रामचंद्र निंबाळकर (जिंतूर, परभणी) असे टॉवरवर चढलेल्या माथेफिरूने नाव आहे. मागील तीन दिवसांपासून पुण्यात येऊनही काम मिळत नसल्याने उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढला असल्याची माहिती प्रल्हाद निंबाळकर याने लोणी काळभोर पोलिसांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 09) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवाई पार्क परिसरातील उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर एक 25 ते 30 वयोगटातील तरुण चढला होता. त्याला खाली उतरवण्यासाठी परिसरातील नागरिक प्रयत्न करीत होते. मात्र तो कोणाचेही ऐकत नव्हता. यावेळी नागरिकांनी सदरची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहिनीवरून होणारा विद्युत पुरवठा तात्काळ बंद केला.

स्थानिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरूणाला टॉवरवरून खाली उतरविण्याची विनंती केली. मात्र तो काही केल्या खाली येईना. त्यानंतर पोलिसांनी विद्युत वीज महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. सलग दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नानंतर महावितरणचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, टॉवर कर्मचारी, यांनी शिडीच्या सहाय्याने टॉवरवर चढून मोठ्या प्रयत्नाने तरुणाला खाली घेतले. तसेच लोणी काळभोर पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने टॉवरच्या बाजूला तीन ठिकाणी जाळी बसवण्यात आली होती.

यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, उदय काळभोर, रत्नदीप बिराजदार, महावितरणचे लोणी काळभोर शाखेचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, महावितरणचे वायरमन अमोल शेलार, पोपट खारमटे, योगेश गिरी, अजय डोंगरे, तुषार जगताप, रोहित काळभोर, व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, ग्रामस्थ व सर्वांच्या मदतीने संबंधित तरुणाचे मनपरिवर्तन करून त्याला खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सदर इसमास लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.







