Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर, हडपसरसह पुण्यात तब्बल ५ हजार बांग्लादेशी नागरिकांचे कुटुंबांसह वास्तव्य असल्याची धक्कादायक माहिती राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर मागील तीन वर्षांत केवळ ५ बांग्लादेशींना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली महिती
याबाबत यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या काही वर्षांत तब्बल ५ हजार बांग्लादेशी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तर मागील तीन वर्षांत फक्त ५ बांग्लादेशींना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे. पुण्यातील लोणी काळभोर, हडपसर, ससाणेनगर, वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्राच्या या भागात बांग्लादेशींनी आपले बस्तान बसवले आहे.
बांग्लादेशी नागरिक सीमारेषा ओलांडून भारतात येतात. हॉटेल वेटर, बांधकाम मजूर, फेरीवाले आणि इतर कामे करतात आणि हळूहळू कुटुंबासह येथेच स्थायिक होतात.(Loni Kalbhor News) हे सर्व भाड्याची खोली घेऊन राहतात. तसेच आम्ही मूळचे पश्चिम बंगालचे आहोत, असं ते सांगतात. याचाच परिणाम म्हणून सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
दरम्यान, बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी रोखण्यात यावी, तसेच त्यासाठी विशेष शोध मोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात यावी, असे पोलिसांना आदेश आहेत. (Loni Kalbhor News) मात्र, बांग्लादेशी व्यक्ती शोधणे, त्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शोधणे तसेच त्यांची पाठवण करणे आदी कामे वेळखाऊ असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून बांग्लादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचे दिसत आहे. त्यामुळे बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.