लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील अवैध ताडी अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. २०) छापा टाकला होता. या छाप्यात ९० लिटर ताडीसह मुद्देमाल जप्त केला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच अवैध ताडी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात ११० लिटर ताडीसह मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे यांनी दिली.
या प्रकरणी बसवराज नरसय्या भंडारी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात अवैध ताडीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे माळीमळा परिसरात छापा टाकला असता, तेथे बसवराज भंडारी हा ताडी विकताना आढळून आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या छाप्यात ११० लिटर ताडीसह विक्री साहित्य असा सुमारे चार हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे करीत आहेत. ही कारवाई संजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मोडक आणि जवान शशी भाट यांच्या पथकाने केली.