लोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. ९) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
रमेश तुळशीराम शेंडगे (वय ३९, रा. माळीमळा, लोणी काळभोर ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार महेश करे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला दुचाकी धडकून एका व्यक्तीचा अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला, हाताला, गंभीर दुखापत झाली होती. यावेळी नागरिकांच्या मदतीने त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रमेश शेंडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात दुचाकी ही चालवून, संबंधित ठिकाणी दुभाजक न दिसल्याने ब्रिजवरील दुभाजकाला धडकवली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून स्वत: मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.
रात्रीच्या वेळी कठडे दिसत नसल्याने वारंवार अपघात
या उड्डाणपुलावर असलेले कठडे धोकादायक बनले असून, रात्रीच्या वेळी हे कठडे दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नाही. परिणामी, बहुतांश अपघात होत आहेत. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत आहे.