लोणी काळभोर : मार्च महिन्याच्या सुरवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मागील आठ दिवसांपासून लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. विजेच्या खेळखंडोबामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन व कवडीपाट येथे सोमवारी (ता. ४) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वीज गेली. मंगळवारी (ता. ५) दुपारी बारा वाजेपर्यंत वीजेचा पत्ता नव्हता. तब्बत १० तास वीज न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होत आहे. कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या भागात डासांचा प्रादूर्भाव असल्याने रात्रीची झोप उडाली आहे. दैनंदिन दिनचर्येवर याचा परिमाण झाला आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी पूर्व हवेलीतील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेकांना विजेच्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाठ देयके येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
रहिवाशी भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीजपुरवठा न सूचना देता खंडित केला जात आहे. साधारणत: तीन ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपार्टमेंट-सोसायट्यांमध्ये पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. तर, चाकारमान्यांना त्यांच्या आस्थापनाला जाण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वीज कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, विद्युत पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, फुरसुंगीत जमिनीखालून विद्युत पुरवठा करणारी वायर ब्लास्ट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल.
विद्युत उपकरणे नादुरूस्त
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. त्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, भाज्या, दूध खराब होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
– प्रियांका नितनवरे, लोणी स्टेशन, ता. हवेली