विशाल कदम
लोणी काळभोर : अनेक वर्षांपासून बंद असलेल्या जुना मुठा कालवा अर्थात जुना बेबी कालवा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा सुरु केला आहे. जलसंपदा विभागाने त्यावेळी कालव्याची डागडुजी केली होती. मात्र, सध्या कालव्यात वेगवेगळ्या प्रकारची विशिष्ठता: एरंडांची झाडे मोठ्या प्रमाणात उगवली असून, कालव्याला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे या कालव्यापासून कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
जुना बेबी कालवा हा शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी १८६० च्यादरम्यान सुरु करण्यात आला होता. तसेच १९६०च्या दरम्यान, नवीन मुळा मुठा कालवा सुरु करण्यात आला. त्यानंतर जुना बेबी कालवा बंद पडला. त्यानंतर बऱ्याच कालावधीत या जुना बेबी कालव्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. लोकवस्ती वाढल्याने जुन्या कालव्याच्या दोन्ही बाजूने घरे निर्माण झाली. त्यामुळे हा कालवा पूर्व हवेलीतील बहुतांश गावाच्या मध्यभागी झाला आहे.
कुंजीरवाडी गावाच्या मध्यातून कालवा गेलेला आहे. कालवा बंद झाल्याने कालव्याच्या जवळ शाळा व मोठ्या प्रमाणात लोकवस्ती तयार झाली आहे. कालव्या लगत झालेल्या अतिक्रमणामुळे तसेच झाडाझुडपांमुळे जुना कालवा फुटण्याची दाट शक्यता आहे. तरी पाटबंधारे विभागाने त्वरित या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्व नागरिकांनी व्यक्त केली.
कालवा गळतीचे वाढू लागले प्रमाण
शाळेतील मुलांना सुद्धा या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून पाणी सोडण्यास मागील काही वर्षांपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन गावांच्या हद्दीमध्ये कालवा गळतीचे प्रमाण वाढू लागले. तसेच या कालव्यातून सतत पाण्याचे आवर्तन सुरु असल्याने परिसरातील शेतकरी व रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे गरजेचे, पण…
हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे गरजेचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
कालव्यातील पाण्याची दुर्गंधी, जलपर्णीची बेसुमार वाढ
कालव्यातील पाण्याची दुर्गंधी पसरली असून, परिसरात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. कालव्यामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. तसेच, डासांचा उच्छाद वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कालव्याच्या शेजारी असलेल्या काही शेतकऱ्यांनी झाडी काढण्यास विरोध दर्शविल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कालव्याची साफसफाई करण्याचे काम थांबविण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने कालव्यातील जलपर्णी काढून कालवा स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जुना बेबी कालवा गेला आहे. या कालव्यात जलपर्णी व झाडी असल्याने कालवा फुटू शकतो आणि मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाने खबरदारी म्हणून त्वरित उपाययोजना करावी.
– नानासाहेब कुंजीर, शेतकरी, कुंजीरवाडी, ता. हवेली.
जुना बेबी कालव्याची डागडुजी व साफसफाईचे काम सुरु
जुना बेबी कालव्याची डागडुजी, साफसफाई व दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. या कामाला कोणीही अडथळा निर्माण केलेला नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार काम सुरु आहे. कुंजीरवाडी गावालगत असलेल्या कालव्यातील साफसफाई पुढील दोन दिवसात केली जाईल.
– पल्लवी जोशी, अधिकारी, पाटबंधारे विभाग, खडकवासला, पुणे.