(Loni Kalbhor) लोणी काळभोर : वाढता उडाका आणि त्यात मध्ये गायब होणारी वीज यामुळे नागरिक त्रासले आहेत. रात्रभर गरमीमुळे पुरेशी झोप मिळणे देखील कठीण झाले असताना डासांची संख्या वाढल्याने नागरिक त्रासले आहेत.
बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णी वाढली…!
साडेसतरानळी ते शेवाळेवाडी परिसरातून वाहणार्या बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णी वाढली आहे. या डासांच्या त्रासाला येथील रहिवाशांना दुर्गंधीसह तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने कालव्यातील जलपर्णी तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुळा-मुठा नदीतील मुंढवा जॅकवेलमधून साडेसतरानळी येथून पुढे मांजरी, लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी व फुरसुंगी परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये प्रक्रियाविना सांडपाणी सोडले जात आहे.
त्यामुळे कालव्यातील पाण्याची दुर्गंधी पसरली असून, परिसरात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. त्यामध्ये कालव्यात कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. तसेच, डासांचा उच्छाद वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे महापालिका व पाटबंधारे विभागाने कालव्यातील जलपर्णी काढण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रा. पोपटराव कामठे, प्रवीण चोरघडे, अक्षय घुले, अजित काळे आदींनी केली आहे.
कालव्यात साचलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारखे आजार झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने परिसरात औषध फवारणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत. असे अमरसृष्टी सोसायटीतील रहिवासी संदीप सिन्नरकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.