Loni Kalbhor : लोणी काळभोर : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. विजेत्या खेळाडूंचे राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे नुकतीच राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणी काळभोर येथील नेत्रा भागवत थोरात, प्रशांत महादेव गोडसे व सुहाना दगडू शेख या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत नेत्रा हिने १७ वर्षाखालील ४० किलो वजनी गटात ४४ किलो स्नैच व ५६ किलो क्निनजर्क असे 100 किलो वजन उचलून राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. प्रशांत गोडसे याने 102 किलो वजनी गटात 61 किलो स्नैच व 85 किलो कनीनजर्क असे एकूण 146 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. तर सुहाना रोख हिने 59 किलो वजनी गटात 41 किलो स्नैच व 47 किलो कनीनजर्क असे एकूण ८८ किलो वजन उचलून 19 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकाविले आहे.
नेत्रा थोरात, प्रशांत गोडसे, सुहाना शेख यांचं यश
नेत्रा थोरात ही लोणी काळभोर येथील सेंट तेरेसा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. प्रशांत गोडसे हा न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर सुहाना शेख ही एंजेल हायस्कूलमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहे. या तिन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
विजेत्या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन
विजेत्या खेळाडूंना सह्याद्री स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटरचे प्रशिक्षक गणेश नगीने, अमर गिरी व नरेश गिरी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. या सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे महाराष्ट्र वेटलिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर व सचिव संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.