Loni Kalbhor: लोणी काळभोर: दिवाळी सणाला प्रारंभ झाला असून, दिवाळीच्या पहिल्या दिवसाची अर्थात वसुबारसची सुरूवात गुरुवारी (ता.९) झाली. तर शुक्रवारी (ता.१०) धनत्रयोदशी नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. दिवाळीचा तिसरा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन होय. यंदा लक्ष्मीपूजन रविवारी (ता.12) आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील महिलांनी शनिवारी (ता.11) खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील आठवडे बाजार हा शनिवारी असतो. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी सकाळपासूनच खरेदीसाठी वर्दळ केली होती. पूजेच्या साहित्याबरोबर बाजारात विविध फळांची आवक वाढली होती. तसेच ऊस, केळीची पाने, अंबोती आदी साहित्य बाजारात उपलब्ध होते. नागरिकांनी विशेषत: आकाश कंदील, दिवे, पणत्या, रांगोळी, झेंडूची फुले, पूजेचे साहित्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, सोन्या-चांदीचे दागिने आदी खरेदीसाठी पसंदी दिली. तर शेतकरी वर्ग देखील बाजारात येऊनच खरेदी करत आहे.
लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात लक्ष्मी, लक्ष्मी मूर्ती, बोळकी, लाह्या, बत्ताशे, पंती अगरबत्ती, शिवाजी महाराजांची मूर्ती, मावळे व किल्ले असलेली दुकाने रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात थाटली होती. बाजारात लक्ष्मीची मूर्ती ५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत विक्रीसाठी होती. यावेळी महिलांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती.
दरम्यान, लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरातील दुकाने साहित्यांनी सजली आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि दुचाकींच्या शोरुम तसेच सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये बुकींगसाठी गर्दी वाढत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांनी खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट, तसेच बक्षीस ठेवले आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी विविध साहित्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे उलाढालही अधिक होत आहे.
बालचमूंची बाजारात लुडबुड
यंदा सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळीतील किल्ल्यांच्या प्रतिकृती खरेदीसाठी बालचमूंची बाजारात लुडबुड सुरू आहे. शिवराय, गडकिल्ले, बुरूज, मावळे आदींच्या प्रतिकृती खरेदी केल्या जात आहेत. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी पणती आणि दिवे परंपरा आहे. त्यामुळे विविध आकारातील पणती आणि दिवे खरेदी केले जातात. काही नागरिकांकडून परंपरा जपत मातीचे दिवे आणि पणत्यांना पसंती दिली जात आहे.
लक्ष्मी मूर्ती व पूजेचे साहित्य विकणे हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आमचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र, आज आठवडे बाजार असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना थोडाफार फटका बसण्याची शक्यता आहे.
– अनिल कुंभार, कुंभार व्यवसायिक, लोणी काळभोर, ता.हवेली
दागिने खरेदी करण्यास गर्दी वाढेल
‘दिवाळीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे विविध प्रकार बाजारामध्ये येतात. त्यामुळे ग्राहक दिवाळीमध्ये दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. ‘यंदा दसऱ्यापासूनच सोने-चांदी खरेदी करण्यास नागरिकांनी पसंती दर्शवून चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठी आणखी गर्दी वाढेल.’
– अंकित रावळ, संचालक-महादेव ज्वेलर्स, लोणी काळभोर, ता.हवेली