Loni Kalbhor : लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे सिमेंटने भरलेला ट्रक बुधवारी (ता. ३०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला. यामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली. ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलीस व ट्रक चालकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यांना यश येत नव्हते. अखेर उपस्थित नागरिकांनीच जालीम उपाय सुचवला आणि अवघ्या २ मिनिटांमध्ये ट्रक बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील मालधक्क्यावरून एक ट्रक सिमेंट भरून पुण्याच्या दिशेने चालला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना ट्रक लोणी स्टेशन चौकाच्या मध्यभागी अचानक बंद पडला. (Loni Kalbhor) यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव व पोलीस हवालदार संतोष बांगर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी हा ट्रक चौकातून बाजूला करून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी क्रेन मागवण्याचे ठरवले. परंतु क्रेन येण्यासाठी वेळ लागणार होता.
दरम्यान, लोणी काळभोर येथील उद्योजक सतीश काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नितीन लोखंडे यांनी समयसूचकता दाखवून, महामार्गावर सिमेंटने भरलेला ट्रक बाजूला काढण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली. (Loni Kalbhor) सतीश काळभोर यांनी ट्रकला दोरी बांधून, ट्रक्टरच्या सहाय्याने ट्रक रस्त्यातून बाजूला घेतला. त्यानंतर पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.
सतीश काळभोर, नितीन लोखंडे यांच्या समयसूचकतेचे कौतुक
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत सामाजिक कामे करण्यासाठी सतीश काळभोर व नितीन लोखंडे हे नेहमी अग्रेसर असतात. (Loni Kalbhor) गरजवंतांच्या मदतीला हे दोघेही नेहमी धावून जातात. त्यामुळे या दोघांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो.